Bhosari News : भोसरीच्या सार्थक मटाले याला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेचा सुवर्णलक्ष्य पुरस्कार

एमपीसी न्यूज – रोल बॅाल, रोलर हॉकी व आईस हॉकी या स्केटींगच्या वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत छाप सोडणा-या व विविध पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या सार्थक मटाले याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने दिलया जाणाऱ्या मानाच्या सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला.
मुळचा जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचा असणा-या सार्थकच्या नावावर 12 सुवर्णपदके, 4 रौप्य व 2 कांस्यपदक व विविध प्रकारची 11 चषक आहेत.
याशिवाय बेळगाव येथे झालेल्या सांघिक रोल बॅाल स्पर्धेत सलग 24 तास खेळून त्याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्ड मध्येही स्थान मिळवले. 2018 मध्ये रिव्हर्स स्केटींग लार्जेस्ट मँरेथॅान मध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले.
सार्थकला नोव्हेंबर 2018 मध्ये जुन्नर तालुका मित्र मंडळ सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजन्मभूमी क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि आता त्याला मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रिडा पुरस्कारानेही त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
सार्थकचे वडील विठ्ठल व चुलते आण्णासाहेब हे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने भोसरी येथे आले. लहानपणापासूनच सार्थकला खेळाची आवड होती.
शाळेतच त्याला स्केटींग या खेळाची आवड निर्माण झाली. शाळेतील क्रीडा शिक्षक शैलेंद्र पोतनीस यांनी त्याला स्केटींगचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली.
सार्थकने सुरूवातीला 2017 मध्ये शालेय संघातून आंतरशालेय स्पर्धेत खेळण्यास सुरूवात केली. जिल्हा पातळीवर मुंबई, पुणे, नंदुरबार, नांदेड याठिकाणी खेळला.
त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये लेह लडाख या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आईस हाँकी या क्रीडा प्रकारात उणे 35 अंश सेल्सिअस तापमानात तो महाराष्ट्राच्या संघासाठी खेळला.
सार्थकने मिळणा-या प्रत्येक संधीचं सोनं करत मोठमोठ्या यशाला गवसणी घातली. अनेक स्पर्धा जिंकत अनेक पदकं आणि रोकॅार्ड आपल्या नावावर नोंदवले. सार्थकची विजयी घोडदौड सुरूच आहे.
सार्थक आपल्या यशात गुरू शैलेंद्र पोतनीस, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आई -वडील, चुलते व मित्रांची मोलाची साथ मिळाल्याचे सांगतो. रोलर हॉकी खेळासाठी भारतीय संघातून खेळून जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचविण्याचे स्वप्न उराशी सार्थकने बाळगले आहे.