Bhosari News : लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित गव्हाणे : आमदार निलेश लंके

नगरसेवक अजित गव्हाणे यांनी स्व:खर्चाने लसीकरणाचा शहरातील पहिलाच उपक्रम

लसीकरणाचे आणखी दोन दिवस वाढविले; रविवारपर्यंत होणार मोफत लसीकरण

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीतून वाचण्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांचे वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु, लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडथळा येत आहे. अशा परिस्थितीत आपल्या प्रभागातील नागरिक सुरक्षित रहावेत, त्यांना वेळेवर लस मिळावी यासाठी कै. दामोदर रामभाऊ गव्हाणे प्रतिष्ठाण यांच्या सौजन्याने, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून मोफत लसीकरणाचा अतिशय चांगला आणि सुंदर उपक्रम घेतला. शासनावर अवलंबून न राहता स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून अजित गव्हाणे यांनी प्रभागातील नागरिकांचे लसीकरण केले, असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. लोकप्रतिनिधी ,जनसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित गव्हाणे असल्याचे गौरवोद्गार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काढले.

कै. दामोदर रामभाऊ गव्हाणे प्रतिष्ठाण यांच्या सौजन्याने आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर, भोसरी येथे ‘सर्वांनी मनापासून ठरवूयात, प्रत्येकाचं लसीकरण करूयात’ या दमदार घोषवाक्याने’ मोफत लसीकरण मोहिमेला सोमवार पासून सुरुवात झाली होती.

सुरुवातीला ही मोहीम 26 ते 30 जुलै 2021 या कालावधीत असणार होती. आता त्यामध्ये दोन दिवसांनी वाढ केली असून रविवार पर्यंत मोफत लसीकरण मोहीम असणार आहे. या लसीकरण केंद्राला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी गुरुवारी भेट दिली. या उपक्रमाचे कौतुक केले.

माजी आमदार विलास लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. आमदार लंके यांनी कोरोना काळात शरद पवार आरोग्य मंदिर या नावाने पारनेरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये हजारो लोकांवर मोफत उपचार करण्यात आले. या कामगिरीमुळे आमदार लंके यांचे देशभरात कौतुक झाले. त्यांना विविध पुरस्कार मिळालेत.

आमदार निलेश लंके म्हणाले, “आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमचे दुसरे सहकारी मित्र अजित गव्हाणे यांनी मोफत लसीकरणाचा उपक्रम राबविला. प्रभागातील नागरिकांचे मोफत लसीकरणाचा कौतुकास्पद उपक्रम आहे. आपल्या प्रभागातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोफत लसीकरण केले. याचा 1 हजारहून अधिक जणांनी लाभ घेतला. हा अतिशय चांगला आणि सुंदर उपक्रम आहे.

शहरातील पहिलाच असा उपक्रम आहे. शरद पवारसाहेब ,अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. जेष्ठ नेते विलास लांडे यांचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन असते. समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची शिकवण आम्हाला नेत्यांनी दिली आहे.

नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले. सुरवातीला 26 ते 30 जुलै असे पाच दिवस लसीकरण केले जाणार होते. दररोजचे 200 या प्रमाणे 1 हजार डोस दिले. आता यासाठी जवळचे मित्रपरिवार आणि प्रभागातील व्यावसायीक पुढे आले आहेत.

मोफत लसीकरण मोहिमेसाठी अधीकचे 500 डोसेससाठी त्यांनी हातभार लावला. शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस आणखी 500 डोस उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे प्रभागातील ज्यांचे लसीकरण राहिले आहे, अशा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. मोफत लसीकरण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो”.

नगरसेक अजित गव्हाणे यांनी स्व:खर्चाने 1 हजार डोस उपलब्ध केले. तर, संतोष डफळ, दत्ता जैद, अर्जुन येलभर, संतोष मोरे, संजय उदावंत, संजय चौघुले, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष योगेश गवळी, संदेश जाधव, अमोल पंचरास, विनोद गव्हाणे, प्रविण जाधव, योगेश लोंढे यांनी 500 डोस उपलब्ध करण्यासाठी हातभार लावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.