Bhosari News: खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून भोसरीकरांसाठी 50 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस

16 ते  30 ऑक्टोबर  पर्यंत भोसरीत विशेष लसीकरण मोहिम

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे 50 हजार डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 16 ते  30 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम राबवत भोसरीतील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्यांमध्ये वाहनांच्या माध्यमातून जाऊन नागरिकांचे लसीकरण केले जाईल. नागरिकांनी लस टोचून घ्यावे असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान आयोजित शिरुर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत कोविड लसीकरण मोहिम सुरु आहे. त्याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी 50 हजार लसीचे डोस दिले आहेत. त्याचा शुभारंभ आज (शनिवार) पासून करण्यात आला. भाजप नगरसेवक रवी लांडगे यांच्या प्रभागातून मोहिमेला सुरुवात झाली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, नगरसेवक रवी लांडगे, संजय उदावंत उपस्थित होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ”शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे पाच लाख डोस उपलब्ध करुन घेतले आहेत. कोरोनाचे संकट पाहिले. पहिली, दुसरी लाट पाहिली आता तिसरी लाट येऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. लसीकरणाची टक्केवारी जास्तीत-जास्त वाढली. तर, कोविडची तिसरी लाट टाळू शकतो. या भावनेने लसीकरणाची मोहिम करत आहोत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार डोसेस देत आहोत”.

भोसरीत आजपासून लसीकरण मोहिम सुरु केली. 16 ते  30 ऑक्टोबर  पर्यंत भोसरीकरांसाठी या लसी उपलब्ध असतील. त्यासाठी सेंटर तयार केले आहेत. गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्यांमध्ये वाहनांच्या माध्यमातून जाऊन नागरिकांचे लसीकरण केले जाईल. महापालिकेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होईल. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. रवी लांडगे यांच्या प्रभागातून या उपक्रमाची सुरुवात केली. अंकशुभाऊ लांडगे यांनी विकासकामांची वाट दाखवून दिली. त्यावाटेवर रवीभाऊ लांडगे चालत आहेत. सातत्याने समाजासाठी काम करत आहेत. वेगळा आदर्श निर्माण करत आहे. त्याचा खरोखर मनस्वी आनंद होत आहे, असेही खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.