Bhosari News : इंद्रायणीनगरमधील प्रस्तावित पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करा : रवी लांडगे

एमपीसी न्यूज – भोसरी, इंद्रायणीनगर पेठ क्रमांक 1 मधील प्रस्तावित पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी नगरसेवक रवी लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक रवी लांडगे यांनी म्हटले आहे की, “इंद्रायणीनगर पेठ क्रमांक 1 येथील ओमनगरी, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी येथे पाण्याची टाकी प्रस्तावित आहे. ही पाण्याची टाकी ही धावडेवस्ती, भगतवस्ती आणि गुळवेवस्ती येथील नागरिकांसाठी करण्यात येत असल्याचे दर्शविण्यात येत आहे.

वास्तविक धावडेवस्तीसाठी पांजरपोळ येथील पाण्याच्या टाकीमधून आणि भगतवस्तीसाठी इंद्रायणीनगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही टाक्या 20 लाख लिटर क्षमतेच्या आहेत. स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या दूरदृष्टीतून या भागासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आजतागायत या परिसरातील नागरिकांची पाण्याविषयी एकही तक्रार आलेली नाही. खरोखरच पाण्याच्या टाकीची आवश्यकता असेल तर पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी. कारण ओमनगरी येथील गुरुदत्त हौसिंग सोसायटीच्या आवारात असलेल्या ओपन स्पेसमध्ये असलेले दत्तमंदिराचे भूमिपूजन हे स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या परिसरातील भाविकांसाठी मोठे मंदिर व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. त्याचप्रमाणे या भागातील रहिवाशांनी स्व:खर्चातून हे प्लॉटस् एनए केलेले आहेत. त्यांना ओपन स्पेस व मंदिराची गरज आहेच. त्यांच्या या न्याय हक्कांवर गदा आणू नये.

पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी, विकास व्हावा ही सर्वांचीच प्रामाणिक इच्छा असते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन पाण्याच्या टाकीचा निश्चितच फायदा या परिसरातील नागरिकांना होईल. परंतु, तेथील सोसायटीमधील नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, याचा प्रशासनाने विचार करावा.

त्या परिसरात इतरही जागा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागा देण्यासाठी मीही प्रयत्नशील राहील. लोकांच्या भावनेचा आदर करावा, असे लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.