Bhosari news: इंद्रायणीनगर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची महापौरांकडून विचारपूस

एमपीसी न्यूज – भोसरी येथील इंद्रायणी नगर येथे झालेल्या विद्युत रोहित्राच्या स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांची महापौर उषा ढोरे यांनी त्यांच्या कोतवालवाडी, च-होली येथील घरी जाऊन आज (सोमवारी) भेट घेतली. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. पालिकेच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर ढोरे यांनी कुटुंबियांना दिले.

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे उपस्थित होते. महापौर ढोरे यांनी इंद्रायणीनगर येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली.‍

शनिवारी (दि.5) इंद्रायणीनगरमध्ये विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या.

यामध्ये शिवन्या सचिन काकडे या पाच महिन्याच्या बालिकेसह तिची आई हर्षदा सचिन काकडे आणि आजी शारदा दिलीप कोतवाल यांचा समावेश आहे.

यातील शिवन्या आणि शारदा कोतवाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर हर्षदा काकडे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

घटनेचे गांभिर्य पाहता शहरात यापुढे अशाप्रकारच्या गंभीर घटना घडून जीवीत अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी महापौर ढोरे यांनी महावितरणच्या प्रमुख अधिका-यांची तसेच महापालिका अधिका-यांची 8 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.