Bhosari News: संशयित चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

घाबरलेला संशयित चोर बांधून ठेवलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

एमपीसी न्यूज – घरात चोरी करण्यासाठी चोर आला असल्याच्या संशयावरून नागरिकांनी संशयित चोरट्याला बांधून ठेवले. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याच्या हृदयाभोवती पाणी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.18) पहाटे सव्वा पाच वाजता फुगे माने तालीम जवळ भोसरी येथे घडली.

नारायण विठोबा फुगे (वय 60), गणेश विठोबा फुगे (वय 32), कुणाल विठोबा फुगे (वय 28, सर्व रा. फुगे माने तालीम जवळ, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शंकर महादेव हौसे (वय 36, रा. समर्थनगर, दिघी. मूळ रा. चिंचोली, ता. केज, ता. बीड) असे मृत्यू झालेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास मयत शंकर आरोपी यांच्या घरात आला. आरोपींनी त्याला चोर समजून त्याला खोलीत पकडून ठेवले आणि तो पळून जाऊ नये म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बांधून ठेवले.

घाबरलेला संशयित चोर बांधून ठेवलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला असता मृत्यूचे कारण समोर आले. शंकर याच्या हृदयाभोवती पाणी झाले. त्याचा दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

यावरून तीन जणांवर भारतीय दंड विधान कलम 304, 342, 323, 34 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात नारायण विठोबा फुगे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर महादेव हौसे (वय 36) याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण फुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी पहाटे पाच वाजता आरोपी मृत शंकर फिर्यादी यांच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून दरवाजा उघडून चोरी करण्याच्या उद्देशाने घरात आला.

त्याने घरातील साहित्याची आदळआपट करून नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला बांधून ठेवले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.