एमपीसी न्यूज -दरवर्षीप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी चाकण – भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटना यांनी ‘एमआयडीसी प्रीमियर लीग क्रिकेट जियाताई कप’ स्पर्धेचे आयोजन अतिशय दिमाखात केले आहे. ही स्पर्धा सिल्वर क्रिकेट ॲकॅडमी पाटील नगर, चिखली येथील स्टेडियमवर आयोजित केली असून 23,24 व 25 जानेवारी 2023 रोजी ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक जियाताई लेझर कंपनी तर सहप्रायोजक अल्ट्रा कॉर्पोटेक कंपनी, बोडोर लेझर, नेत्रा सेल्स व किंजल प्रिस्टीन हे आहेत. या क्रिकेट स्पर्धेसाठी उद्योगपती, उद्योजक व हजारो कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेची माहिती देताना चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी सांगितले की, सदर स्पर्धा ही कंपनीचे मालक व कंपनीचे कामगार यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते.
पहिल्या वर्षी 4 कंपन्याच्या टीम्स खेळल्या, दुसऱ्या वर्षी 8 कंपन्याच्या टीम्स व यावर्षी 12 कंपन्याच्या टीम्स खेळणार आहेत. प्रत्येक कंपनीच्या टीम मध्ये स्वतः कंपनीचे मालक व कर्मचारी हे संघ तयार करून ही क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. सदर स्पर्धा ही युट्युब लाईव्ह वरून देखील दिसणार आहे.
तसेच या स्पर्धेकरिता कंपनीच्या टीम्सना डग आऊट, पॅव्हिलियन, व्हीआयपी लाऊंज, भोजन व्यवस्था, डीजे सिस्टीम,एमसीए अंपायर, डीआरएस सर्व टीम प्लेयर्सना जर्सी, ट्रॅक पॅन्ट, कॅप्स या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
ही स्पर्धा फक्त चाकण – भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेशी संलग्न असलेल्या कंपन्यांच्या टीमलाच खेळता येणार आहे.सदर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी एमआयडीसी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे मुख्य समन्वयक निखिल देशमुख, सीए ऋषी खळदकर, प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जयदेव अक्कलकोटे यांनी केलेले आहे.