Bhosari News: गणेश विसर्जनाच्या वेळी इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज – गणपती विसर्जनाच्या वेळी इंद्रायणी नदीत दोनजण बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. बुडालेल्या दुसऱ्या व्यक्तीला शोधण्याचे काम सुरू आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील हवालदार वस्तीजवळ आज (रविवारी) संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

प्रज्वल रघुनाथ काळे (वय18) व दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय 20) अशी या दुर्घटनेत नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यापैकी प्रज्वल काळे याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डुडुळगावच्या माऊली वस्ती येथील ठोंंबरे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यांच्या पैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय 30) नितीन अर्जुन ठोंंबरे (वय 39), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय 20) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय 18) हे चौघे पाण्यात मूर्ती विसर्जनसाठी उतरले. नदी पात्रात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता ठोंबरे व प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले. बुडालेल्या दोघांनाही पोहता येत नव्हते. ते मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते आत पाण्यात गेले होते.

भोसरी एमआयडीसी पोलीस, आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम हाती घेतली. त्यात प्रज्वल काळे याचा मृतदेह पाण्यात आढळून आला असून दत्ता ठोंबरे याचा शोध घेणे चालू आहे.

एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.