Bhosari News : बांधकाम साईटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी साईट मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 मार्च 2022 रोजी दापोडी येथे ही घटना घडली.

जयश्री प्रकाश चलवारे (वय 45) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा मुलगा शंकर प्रकाश चलवारे (वय 26, महात्मा फुले नगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी जुबेर गाझी, फजल खान (दोघेही रा. दापोडी) आणि इतर दोन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला जयश्री प्रकाश चलवारे या बांधकाम साईटवर काम करत होत्या. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.

बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने त्यांचा मृत्यू झाला असं फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार साईट मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.