Bhosari : शाळेत बेकायदा जमाव जमवून कार्यालयाचा ताबा घेतल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह नऊ जणांवर गुन्हा

ही घटना 15 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता भोसरी येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये घडली. : Nine persons, including a former corporator, have been booked for illegally occupying an office at a school.

एमपीसी न्यूज – शाळेत बेकायदा जमाव जमवून राडा घातल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दिघी रोड, भोसरी येथील श्री संगमेश्वर एज्युकेशन ट्रस्टच्या सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये घडली.

माजी नगरसेविका सुखदेवी शेषप्पा नाटेकर (वय अंदाजे 40), संतोष शेषप्पा नाटेकर (वय अंदाजे 38), अंबादास नाटेकर (वय 35, तिघे रा. महेशनगर, पिंपरी), दत्तात्रय लांडगे (वय अंदाजे 50, रा. तुकारामनगर, पिंपरी), लक्ष्मी बिराजदार (वय अंदाजे 32, रा. महेशनगर, पिंपरी) आणि त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कामगोंडा बाळगोंडा पाटील (वय 62, रा. शीतलबाग सोसायटी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी यांच्या शाळेत आले. मयत शेषप्पा नाटेकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दिलेला बदल अर्ज नामंजूर केला असतानाही आरोपी शाळेच्या इमारतीमध्ये जबरदस्तीने आले. तसेच त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला.

फिर्यादी आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेले. ‘आमची कमिटी कोर्टाने ग्राह्य मानली आहे. तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही कोर्टात दाद मागू शकता’ असे फिर्यादी हे आरोपींना समजावून सांगत होते.

त्यावेळी आरोपी माजी नगरसेविका सुखदेवी आणि संतोष यांनी फिर्यादी यांना ‘संस्थेत पुन्हा आला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.