Bhosari: आता भोसरीतील ‘नारी’तही कोरोनाची चाचणी

एमपीसी न्यूज ( गणेश यादव ) : भोसरी-एमआयडीसी परिसरातील एड्‌सबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणा-या राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेत (नारी) आता कोविड-19 म्हणजेच कोरोनाची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. ‘आयसीएमआर’ने दोन दिवसांपुर्वी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. याची पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठी मदत होणार आहे. वायसीएमपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘नारी’त कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याने त्याचे रिपोर्ट लवकर मिळतील आणि तत्काळ रुग्णावर उपचार करण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) कडे पाठविले जात होते. या संस्थेत जिल्ह्यासह विविध भागातून नमुने तपासणीसाठी येत आहेत. ‘एनआयव्ही’वर कामाचा ताण येत होता. यामुळे रिपोर्ट येण्यास विलंब देखील होत होता. त्यामुळे भोसरीतील ‘नारी’संस्थेला कोविडची तपासणी करण्यासाठी परवानगी देण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी प्रयत्न केले. त्यानुसार ‘आयसीएमआर’कडे पत्रव्यवहार करत परवानगी देण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

‘आयसीएमआर’ने दोन दिवसांपुर्वी कोविडची 19 चाचणी करण्यास ‘नारी’ला परवानगी दिली आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.1) पिंपरी महापालिकेने आठ संशयितांचे नमुने तपासणीसाठी नारीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. वायसीएम आणि भोसरी रुग्णालयापासून ‘नारी’ हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे कोरोना संशयितांचे नमुने तपसणीसाठी लागणारा वेळ, रिपोर्ट येण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. रिपोर्ट तत्काळ मिळतील. यामुळे रुग्णांवर लवकर उपचार करण्यास सोपे जाणार आहे.

शहरातून दिवसाला 100 ते 150 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. ‘नारी’ची जास्त क्षमता नाही. त्यामुळे एनआयव्हीकडेही नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. ‘नारी’ने क्षमता वाढविल्यास शहरातील कोरोना संशयितांचे नमुने ‘नारी’तच पाठविले जाणार आहेत. ‘नारी’ जवळ असल्याने मोठा फायदा होणार आहे. तसेच शहरातील स्वॅब कमी झाल्यावर ‘एनआयव्ही’वरील देखील ताण कमी होणार आहे. याचा पुण्याला देखील फायदा होईल. त्यांचे रिपोर्ट तत्काळ येतील.

शहरातच होणार कोरोनाची चाचणी – आयुक्त

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”शहरामध्ये कोरोनाची तपासणी तत्काळ व्हावी याकरिता वायसीएममध्ये ‘आरटीपीसीआर ‘ मशिन विकत घेण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. भोसरीतील ‘नारी’संस्था ही ‘आयसीएमआर’चीच संस्था आहे. ‘नारी’संस्थेमार्फत कोरोनाची चाचणी व्हावी यासाठी आयसीएमआरला विनंती केली होती. त्याला मान्यता मिळाली आहे. लवकर त्यांच्याकडे अधिक क्षमतेने चाचण्या सुरु होतील. जेणेकरुन एनआयव्हीकडे पुण्यासह आजबाजूच्या जिल्ह्यामुळे ताण आल्यास आपल्याला शहरातच कोरोनाच्या तपासण्या करण्यासाठी एक यंत्रणा उपलब्ध होत आहे. त्यामुळे जवळच असलेल्या ‘नारी’त काही चाचण्या होतील. सुरुवातीला कमी चाचण्या होतील. त्यानंतर हळूहळू त्यांची क्षमता वाढेल. त्यानंतर सुरळीत कामकाज होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.