Bhosari : उसन्या पैशांच्या कारणावरून एकाची कंपनीत आत्महत्या

एमपीसी न्यूज – उसने दिलेले पैसे परत मागताना मिळणा-या धमक्या, शिवीगाळ आणि मारहाण याला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.21) रात्री साडेदहा वाजता मेटा डेक कंपनी, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

देवेंद्र लालबहादूर विश्वकर्मा (वय 41, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अभिषेख देवेंद्र विश्वकर्मा (वय 19) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल शिंदे (रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र यांनी आरोपी विशाल शिंदे याच्याकडून 20 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या पैशांची विशाल वारंवार देवेंद्र यांच्याकडे मागणी करत होता. पैसे मागण्यासाठी आरोपी विशाल हा मयत देवेंद्र यांना वारंवार शिवीगाळ करत, धमक्या देत आणि मारहाण देखील करत होता.

त्याच्या या त्रासाला कंटाळून देवेंद्र यांनी ते काम करत असलेल्या कंपनीत सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुखे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.