Bhosari : एटीएम कार्ड ब्लॉक होण्याची भिती दाखवून महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम कार्ड ब्लॉक होण्याची भिती दाखवत एका भामट्याने महिलेकडून ओटीपी नंबर घेऊन त्यांची 99 हजार 397 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 7 मार्च रोजी भोसरी येथे घडली.
सावित्री रामसेवक यादव (वय 48, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सावित्री यांना आरोपीने फोन केला. आपण जनता कल्याण बँकेच्या भोसरी शाखेतून दीपक श्रीवास्तव बोलत असल्याचे सांगत सावित्री यांचा विश्वास संपादन केला. तुमचे डेबीट एटीएम कार्ड ब्लॉक होणार असल्याची भिती सावित्री यांना दाखवत त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती घेतली.
त्यानंतर आलेला ओटीपी क्रमांक घेऊन फिर्यादी यांची 99 हजार 397 रुपयांची फसवणूक केली. हा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तपासाकरिता तो वर्ग करण्यात आला आहे.