Bhosari : बँकेतून बोलत असल्याचे सांगत गोपनीय माहिती घेऊन महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेतून बोलत असल्याचे सांगत डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येणार असल्याची भीती घातली. तसेच कार्डची सेवा सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. खातेधारक महिलेने ओटीपी शेअर केला असता अज्ञातांनी त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार 397 रुपये ट्रान्सफर करून घेतले. ही घटना बालाजीनगर, भोसरी एमआयडीसी येथे घडली.

सावित्री रामसेवक यादव (वय 48, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी 12 एप्रिल रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दीपक श्रीवास्तव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 मार्च रोजी दुपारी घडली. फिर्यादी त्यांच्या कंपनीत असताना आरोपीने त्यांना फोन केला. दि कल्याण जनता सहकारी बँकेतून बोलत असल्याचे म्हणत ‘तुमचे डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येईल’ असे सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेकडून कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर आणि ओटीपी नंबर घेऊन त्याद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 99 हजार 397 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

याबाबत आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.