Bhosari: ‘आढळराव यांनी अगोदर आरोप केले; आता त्यांचा प्रचार कसा करायचा ?’; भोसरीतील नगरसेवक आक्रमक

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून केलेल्या प्रत्येक प्रकल्पाला खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विरोध केला. महेशदादांना टार्गेट केले. त्यांच्याविरोधात पत्रकबाजी केली. आता आढळराव यांचा प्रचार कसा करायचा ? अशी आक्रमक भूमिका घेत भोसरीतील नगरसेवकांनी आढळराव यांचा प्रचार करण्यास नकार दिला. दरम्यान, महेश लांडगे यांनी युतीची भूमिका पार पाडण्याची सूचना आपल्या समर्थकांना केली.

खासदार शिवाजीराव आढळराव यांची काल उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर तातडीने भोसरीतील भाजप नगरसेवकांची बैठक झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी सभापती सीमा सावळे, नगरसेवक विकास डोळस यांच्यासह भोसरीतील सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

भोसरीतील प्रत्येक प्रकल्पाला खासदार आढळराव यांनी विरोध केला होता. सुलभा उबाळे यांनी देखील सातत्याने आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केले. खोटेनाटे आरोप केले. आता त्यांचा प्रचार कसा करायचा? लोकांसमोर त्यांच्यासाठी मत मागायला गेल्यावर लोक प्रश्न विचारतील. आमच्या नेत्यांना सातत्याने पाण्यात बघितले जात असेल तर आम्ही प्रचार कसा करायचा ? असा सवाल नगरसेवकांनी केला. तसेच आढळराव यांनी अगोदर केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत. महेशदादांना विश्वासात घ्यावे त्यानंतर आम्हाला प्रचार करायला सांगा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली.

आमदार महेश लांडगे यांनी ‘भाजप-शिवसेनीची युती झाली आहे. त्यामुळे सर्वांनी युतीचा धर्म पाळावा’ असे सर्वाना आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.