Bhosari : पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करून तिघांनी लुटला चार हजाराचा ऐवज

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर काम करणा-या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील कॅश लुटून नेली. तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 11) पहाटे साडेचार च्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

फुलचंद भास्कर जाधव (वय 23, रा. जुनाई हाईट, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे प्रदीप बधे यांचा साई गौरी पेट्रोलपंप आहे. या पंपावर फिर्यादी फुलचंद सेल्समनचे काम करतात. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एका पांढ-या रंगाच्या स्कुटरवरून तीनजण आले. त्यांनी फिर्यादी फुलचंद यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यासाठी फुलचंद यांनी नकार दिला असता आरोपींनी फुलचंद यांच्या डोक्यात फायटरने मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फुलचंद यांच्याजवळ असलेली 3 हजार 300 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 4 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.