Bhosari : पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल आता स्मार्ट सिटीकडे – डॉ. ब्रिजेश दीक्षित

एमपीसी न्यूज- अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण स्मार्ट मेट्रो पुणेकरांच्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवेल, असा विश्वास महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्यू. इंजिनिअर्स असोसिएशन तर्फे शनिवारी भोसरी येथील, अंकुशराव लांडगे सभागृह येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित अभियंता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दीक्षित बोलत होते.

यावेळी शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ज्यू. इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष जय गुजर, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता आयुब खान पठान, प्रवीण तुपे, कार्याध्यक्ष सुनील बडगावकर,सचिव संतोष कुंदळे उपस्थित होते.

दीक्षित पुढे म्हणाले, ” तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल घडून येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शहराच्या विकासात योग्य उपयोग करण्याचे आव्हान अभियंत्यापुढे आहे. पाषाण युग, कृषी युग, औद्योगिक युग, माहितीचे युग हे टप्पे ओलाढून आज आपण ज्ञानाच्या युगात पोहोचलो आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्पात नाविन्यपूर्ण बाबींवर भर देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे”

पुणे मेट्रो रेल प्रकल्प हा जगातील नागपूर मेट्रो नंतर दुसऱ्या क्रमांकाचा मेट्रो प्रकल्प असणार आहे ज्या ठिकाणी सोलर एनर्जीचा उपयोग सुरवातीपासूनच केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक आणि ग्रीन सिटी म्हणून ओळख आहे. या ठिकाणची 6 मेट्रो स्थानकांचे निर्माण देखील ह्या बाबीं लक्षात घेऊन सर्वांकरिता उपयुक्त अशी स्थानके निर्माण केली जाणार. पुण्यातील मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शहरांचा कायापलट होणार असून या निमित्ताने पुणेकरांना निर्भेळ वातावरणाचा आनंद लुटता येईल. नागपूर आणि पुणे प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असतांना संपूर्ण देशाचा विचार केल्यास याबाबतीत राज्य देखील आघाडी वर असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.

पुणे शहरात मेट्रो रेल्वेचे एकूण 31.254 किंमी लांबीच्या दोन मार्गावर एकूण 30 स्थानके राहणार आहेत. कमीत कमी खर्चात प्रकल्प साकारण्यावरभर देण्यात येत असून देशातील अन्य प्रकल्पाच्या त्रुटी लक्षात घेऊन त्या टाळण्यात येईल. या प्रकल्पात सिग्नलिंग व वाहतुकीची व्यवस्था स्वयंचलित राहणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षेच्या विषयावर लक्ष दिले जाईल. फिडर बससेवा, तिकीटांसाठी स्मार्टकार्ड,कॉमन मोबिलीटी कार्ड आदी अध्यावत सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. बांधकामाशी संबंधित माहिती व कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य झाले आहे.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ” पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहराची रचना उत्तमरीत्या केली असून,येथील अभियंत्यांनी चिकाटीने चांगले काम व सुंदर असे शहर बनविले आहे. आता मेट्रोचे काम या ठिकाणी होत असून आपण स्मार्ट शहर म्हणून याचा नावलौकिक करूया ”

आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर, ” पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. बी.आर.टी., नाशिक फाटा उड्डाणपूल, मुंबई पुणे महामार्ग याच्या निर्माणामध्ये अभियंत्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. रीवर फ्रंट, प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा पुढे नेऊन नवा ठसा निर्माण करण्याकरिता अभयंत्यांना पुढे याव लागेल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.