Bhosari: कोरोनाच्या रुग्णाचे रुग्णालयातून पलायन; पोलिसांच्या मदतीने रुग्ण पुन्हा रुग्णालयात

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले. ही घटना भोसरी येथील नवीन रुग्णालयात घडली. पोलिसांनी रुग्णाचा शोध घेऊन त्याला पुन्हा ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. भोसरी येथील रुग्णालयाभोवती आता पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील नवीन रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोरोनाच्या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री एका रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाकडे संबंधित व्यक्तीचा पत्ता असल्याने त्याच्या पत्त्यावर जाऊन पोलिसांच्या मदतीने वैद्यकीय विभागाने पलायन केलेल्या रुग्णाला परत आणले.

 

अहमदनगर आणि नागपूर येथे देखील कोरोनाच्या रुग्णांनी पलायन केल्याच्या घटना घडल्या आहेत. या रुग्णांनी रुग्णालयातून पलायन करू नये, यासाठी आता रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार कर्मचारी आणि एक अधिकारी यांची रुग्णालयाच्या बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या आवारात नागरिकांच्या प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी प्रशासन काटेकोरपणे काळजी घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.