Bhosari: होम ‘क्वारंटाईन’मधून पसार झालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

एमपीसी न्यूज – राहत्या घरी (‘होम क्वारंटाईन) बंदिस्त झाल्यानंतर पसार झालेल्या भोसरीतील एका रुग्णाला महापालिका कर्मचा-यांनी आज (शुक्रवारी) पोलिसांच्या सहाय्याने शोधले असून, या रुग्णाला महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात ठेवले आहे. दरम्यान, कोणताही ‘होम क्वारंटाईन’ रुग्ण घराबाहेर फिरत असल्यास नागरिकांनी कळवावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा वाढता आहे. आजपर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बहुतांश बाधित परदेशातून आलेले आहेत. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस घरांमध्येच ‘होम क्वॉरंटाईन’ करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेकडून ‘होम क्वॉरंटाईन’चे आवाहन केले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

परदेशातून आलेल्या भोसरीतील एकाला 14 दिवस घरामध्येच ‘होम क्वॉरंटाईन’ होण्यास सांगितले होते. परंतु, ही व्यक्ती सातत्याने घराबाहेर येत होती. तोंडाला मास्क लावत नव्हती, अशा तक्रारी महापालिका अधिका-यांकडे आल्या. तसेच महापालिकेच्या तपासणी पथकाला हा रुग्ण आज घरी आढळला नाही. कुटुंबियदेखील घरी नव्हते. त्यामुळे पोलिसांच्या सहाय्याने महापालिकेच्या कर्मचा-यांनी या ‘होम क्वॉरंटाईन’ सांगितलेल्या व्यक्तीला शोधले. त्यानंतर त्याला आता महापालिकेच्या भोसरीतील रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात ठेवले आहे.

‘होम क्वॉरंटाईन’ असलेल्या व्यक्ती बाहेर फिरत असल्यास 8888006666 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेले केले आहे. तसेच महापालिकेच्या 9922501450 हा व्हॉट्सअॅपवर संपर्क साधल्यास दोन तासात जलद प्रतिसाद पथक मदतीला पोहचेल,असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.