Bhosari News : मटका अड्ड्यावर भोसरी पोलिसांचा छापा; सहा जणांना अटक

दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. त्यात एक लाख 44 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक केली आहे.

अंगद आनंतराव राऊत (वय 44, रा. मारुंजी गाव, ता. मुळशी जि. पुणे), गणेश भिकु जाधव (वय 45, रा. पांडवनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी पुणे), मंगेश सखाराम अंभोरे (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत देवकर वस्ती, भोसरी पुणे), संतोष कुमार भोलानाथ जयस्वाल (वय 42, रा. धावडेवस्ती पुणे), प्रविण मनोहर चव्हाण (रा. चाकण पुणे), दगडु पांडुरंग केदारी (रा. खराबवाडी, चाकण पुणे) अशी अटक केलेल्या आरोपिंची नावे आहेत. याबाबात पोलीस हवालदार राजेंद्र भानुदास राठोड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावात जय मल्हार गॅरेजच्या शेजारी मोकळ्या जागेत काहीजण मटका जुगार घेत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून मटका अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी आरोपी अंगद राऊत आणि गणेश जाधव यांना ताब्यात घेतले. अंगद राऊत यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 82 हजार 715 रुपयांचा तर गणेश जाधवकडून 11 हजार 100 रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.

दोन्ही आरोपींनी सांगितले की, आम्ही केवळ मटका घेण्याचे काम करतो. मंगेश अंभोरे हा आमचा मालक आहे. पोलिसांनी चक्रपाणी वसाहत येथून मंगेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा 19 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगेश हा संतोष जयस्वाल याच्या सोबत मिळून हा मटका व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी जयस्वाल याला ताब्यात घेऊन 10 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त केले. जयस्वाल त्याच्या मटक्याचे कटिंग प्रवीण चव्हाण आणि दगडू केदारी यांना देत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी प्रवीण आणि दगडू यांनाही ताब्यात घेतले. प्रवीण कडून 10 हजार 250 आणि दगडू कडून 10 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सहा आरोपींकडून एकूण एक लाख 44 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.