Bhosari : सकारात्मक मानसिकतेमुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो – डॉ. अनु गायकवाड

एमपीसी न्यूज – मधुमेह झालेल्या व्यक्तीची सकारात्मक मानसिकता मधुमेहाला नियंत्रणात आणण्यास मोठी मदत करते, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. अनु गायकवाड यांनी केले. लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डायबेटीस फेस्टिवलमध्ये ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी ला. विजय अगरवाल, प्रदीप कुलकर्णी, राजकुमार आनंद, योगेश कदम, विनय सातपुते, सुदाम भोरे आदी उपस्थित होते. भोसरी येथे झालेल्या डायबेटीस फेस्टिवलमध्ये सुमारे 650 जणांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सकाळी मधुमेह जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये भोसरी येथील जिजामाता विद्यालय आणि महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांनी जनजागृतीची मशाल पेटवून रॅलीची सुरुवात केली.

योग्य आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांच्या साहाय्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवलेल्या श्रीयुत महाजन यांना मधुमेह विजेता आणि श्रीयुत मिठठू यांना मधुमेह उपविजेता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ. अनु गायकवाड यांनी मधुमेहाबद्दल उपयुक्त माहिती दिली. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्या व्यक्तीसोबत संपूर्ण कुटुंबाने पथ्य पाळले तर त्या व्यक्तीला आनंद होईल. मधुमेहासंबंधी कोणी अवास्तव दावे केले तर त्यावर अंधविश्वास न ठेवता विचारपूर्वक योग्य उपचार घ्यावेत.

ओमप्रकाश पेठे म्हणाले, लायन्स क्लबच्या माध्यमातून जगभरात सेवाकार्य सुरू आहे. जिथे गरज आहे, तिथे लायन सेवा देत असतात. मधुमेहाबद्दल जनजागृती आणि उपचार लायन्स क्लबच्या माध्यमातून सातत्याने केले जातील.

दत्ता कोहिनकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. सकारात्मक मानसिकतेने मधुमेहासारख्या समस्येला आपण तोंड देऊ शकतो. नकारात्मक विचारांना थारा न देता नेहमी सकारात्मक विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

मुरलीधर साठे, चंद्रकांत सोनटक्के, डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. शिवांजली गरुड, सोनू गव्हाणे, डॉ. प्रशांत गादिया, सुदाम भोरे, रोहिदास आल्हाट, पुरुषोत्तम सदाफुले, अरुण इंगळे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डचे अध्यक्ष ला. मुकुंद आवटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रकांत सोनटक्के यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.