Bhosari : चिखली, मोशी, वडमुखवाडी, भोसरीत चित्ररथाद्वारे मतदान जनजागृती 

एमपीसी न्यूज –  लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पथनाट्य, चित्ररधाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे. अशा परिसरामध्ये या चित्ररथ व कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज (सोमवारी) तळवडे चौक, चिखली चौक, मोशी, वडमुखवाडी आणि भोसरी याठिकाणी चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात आली. 
चित्ररथ व कलापथक यांच्याद्वारे मतदान जनजागृतीची विशेष मोहीम सुरु आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केला जात आहे. विविध उपक्रम आणि कार्यक्रमांतून मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. यासाठी विशेष चित्ररथ आणि कलापथकाद्वारे मतदान जागृती केली जात आहे. याकरिता निवडणूक कक्षाद्वारे भोसरी,पिंपरी,चिंचवड या विधानसभा मतदारसंघासाठी तीन खास चित्ररथांची निर्मिती करण्यात आली आहे.

  • भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी चित्ररथाचे औपचारिक उद्घाटन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टीकर,आण्णा बोदडे आणि स्वीप समन्वयक अधिकारी ज्योत्स्ना शिंदे तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी कला पथकांने मतदान जनजागृतीसाठी गीतासह नाटिका सादर करून मतदानाचे आवाहन केले.
या माध्यमातून निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांनी व्यक्त केला.याप्रसंगी स्वीप कक्षाचे सहाय्यक अधिकारी प्रदीप शिंदे,अविनाश वाळुंज, बाळासाहेब जाधव,क्षितीज शिंदे, मनोज मराठे उपस्थित होते. जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक भोसले यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.