Bhosari : दारूच्या दुकानांसमोर ‘तळीरामां’च्या सकाळपासून रांगा

एमपीसी न्यूज – दारू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याची माहिती रविवारी (दि. 3) शासनाने दिली. त्यांनतर सोमवारी सकाळपासून तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर भल्या मोठ्या रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शहर पोलिसांनी शहरातील वाईन शॉपसमोर पोलीस बंदोबस्त लावला आहे.

इंद्रायणीनगर, भोसरी येथे एक वाईन शॉप आहे. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून या दुकानासमोर नागरिकांनी रांग लावायला सुरुवात केली. तासाभरात ही रांग लांबपर्यंत गेली. काहीजण शारीरिक अंतर राखून उभे राहिले तर काहीजणांनी शारीरिक अंतराला दारुच्या दुकानापुढे हरताळ फासला. पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आला असल्याने वाईन शॉप समोर उभारलेल्या नागरिकांना शारीरिक अंतर राखून उभे राहण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली.

दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी संपला. तत्पूर्वी शासनाने तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवला. हा तिसरा टप्पा सोमवार पासून सुरू झाला. रविवारी राज्य शासनाने कंटेन्मेंट झोन वगळता अन्य सर्व ठिकाणी दारू विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची तिजोरी तळाला गेली आहे. मद्य विक्रीतून शासनाला सर्वाधिक महसूल मिळत असल्याने दारू विक्रीची दुकाने सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.