Bhosari : दरोडा, वाहनचोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक; दोन गुन्ह्यांची उकल, ‘गुन्हे शाखा युनिट एक’ची कामगिरी

एमपीसी न्यूज – दरोडा आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोघांना अटक केली आहे. ही कारवाई ‘पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एक’च्या पोलिसांनी केली. भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ई-या उर्फ वीरू अमन्ना धोत्रे (वय 19, रा. कासारवाडी, भोसरी), स्वप्नील सतीश गुरव (वय 19, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 16) गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ई-या हा कासारवाडी स्मशानभूमीजवळ येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने भोसरी परिसरात एप्रिल 2019 मध्ये एक दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपी ई-या, रावण उर्फ सर्फराज, बंटी गावडे, अरबाज, अक्षय कांबळे, मेघराज, वश्या व त्याचे दोन मित्र मिळून 28 एप्रिल 2019 रोजी पम्मी आदियाल याला पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करीत होते. ही भांडणे सोडविण्यासाठी पम्मीचे मित्र धनराज दिनेश पंडाराम आले. त्यावेळी आरोपींनी पिस्टल काढून जमलेल्या लोकांच्या दिशेने रोखून धनराज यांना लुटले.

लोकांच्या दिशेने दगड फेकून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबात धनराज यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये भोसरी पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली होती. मात्र, आरोपी ई-या अद्याप फरार होता. सात महिन्यानंतर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

दुस-या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन दिघी मॅगझीन चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा रचला. आरोपी स्वप्नील मॅगझीन चौकातून आळंदीकडे दुचाकीवरून जात होता. पोलिसांनी त्याला अडवले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत विचारले असता त्याने ती मोटारसायकल दिघी येथून चोरल्याचे सांगितले. त्याला दिघी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहार.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, प्रवीण पाटील, विजय मोरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like