Bhosari : संतपीठ झाले, आता ‘संतभूमी’साठी पाठपुरावा; आमदार महेश लांडगे यांचे यश

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून संतपीठासाठी जागा आणि निधी मंजूर झाला आहे. 2013 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. संतपीठाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभर पोहोचण्यासाठी मोठी मदत होणार आहे. संतपीठ झाल्यानंतर आता या परिसरासाठी ‘संतभूमी’ म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती संतपिठासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राजू महाराज ढोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीमध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाविषयी समाजातील मान्यवरांना उत्सुकता आहे. माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्‍टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या आरक्षित असलेल्या जागेवर संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे.

राजू महाराज ढोरे म्हणाले, “भारत देश विविध संस्कृती, सभ्यतांनी नटलेला आहे. भारतामधील सर्व जाती, धर्मांमध्ये संत होऊन गेले आहेत. त्यांची शिकवण आजच्या समाजाला खूप गरजेची आहे. सर्व संतांनी शांतीचा संदेश दिला आहे. संत विचार जागतिक पातळीवर नेऊन मांडण्यासाठी या संतपीठाची मोठी मदत होणार आहे. संतपीठाच्या माध्यमातून हा संतविचार जागतिक पातळीवर मांडला जाणार आहे. संत संदेशांचे शिक्षण या संतपीठामध्ये दिले जाणार आहे. भारताची विविधतेतून एकता आणि शांती या दोन गोष्टी जगाच्या कल्याणासाठी महत्वाच्या आहेत. संतांची ग्रंथरूपी संपत्ती भारताला लाभली आहे. ते शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. यातून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

देहू, आळंदी, चिखली ही संतांची भूमी आहे. या परिसराला मोठा वारकरी वसा लाभला आहे. त्यामुळे या परिसराला ‘संतभूमी’ म्हणून शासकीय मान्यता मिळण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही राजू महाराज ढोरे यांनी सांगितले.

‘व्हिजन 2020’ अंतर्गत अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा समन्वय

आमदार महेश लांडगे यांनी 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरी विधानसभा मतदार संघाचा ‘व्हिजन 2020’ हा संकल्प सोडला. याअंतर्गत अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा समन्वय साधण्यासाठी संतपीठाची संकल्पना मांडण्यात आली. ही संकल्पना पूर्णत्वाकडे जात असून संतपीठाचे भूमिपूजन झाले. संत शिकवणीसह आधुनिक शिक्षणाचा देखील या माध्यमातून प्रसार केला जाणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळे असा समन्वय साधणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरी संस्था स्थापन करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.