Bhosari: जागेसह फ्लॅटच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी विवाहितेला मारण्याची धमकी

सासरच्या आठ जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या नावावर असलेली 11 गुंठे जागा आणि फ्लॅट विकण्यासाठीच्या  कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी सासरच्या मंडळींनी तिच्यावर दबाव टाकला.  शारिरीक, मानसिक त्रास देऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सासरच्या आठ जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशिकांत नामदेव पवार (वय 40), कांताबाई नामदेव पवार (वय 60), नामदेव तुकाराम पवार (वय 65), संतोष नामदेव पवार (वय 36), सारिका संतोष पवार (वय 30), आशा काळे (वय 50), तात्या जगदाळे (वय 55), अमर उर्फ भोर्‍या धावडे (वय 25, सर्व रा. सुखदेव नारायण मार्ग, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची 11 गुंठे जागा आणि तळेगाव येथे फ्लॅट आहे. ही जागा आणि फ्लॅट विकण्यासाठी आरोपींनी त्यांना कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, फिर्यादी यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने त्यांचा 2011 ते 24 एप्रिल 2020 या कालावधीत वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ केला. त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.  मारण्याची धमकी दिली.

भोसरी ठाण्याचे फौजदार तलवाडे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.