Bhosari : शैक्षणिक कर्जाचा हप्ता न भरल्याने विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्याने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून त्यास मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी एम पॉकेट मे ब्राईट व्हेन्च्युअर्स प्रा. लि. कोलकता या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे 7 जानेवारी रोजी घडली.

धनंजय जयवंत जाधव (रा. गणराज कॉलनी, देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 7605089254 या मोबाइलवरील कंपनीचा कॉलर आणि एम पॉकेट मे ब्राईट व्हेन्च्युअर्स प्रा. लि. कंपनीचे चालक आणि मालक (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत धनंजय यांचे वडील जयवंत जाधव यांनी बुधवारी (दि. 26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयवंत यांचा मुलगा धनंजय याने एम पॉकेट मे ब्राईट व्हेन्च्युअर्स प्रा. लि. या कंपनीकडून दहा हजार रुपयांचे विद्यार्थी कर्ज घेतले होते. त्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरले नव्हते. यामुळे आरोपींनी आपसांत संगनमत करून धनंजय यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. ‘तू मर किंवा काहीही कर परंतु आम्हाला आमचे पैस देऊन टाक’ असे म्हणून धनंजय यास आत्महत्येस प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून धनंजय याने 7 जानेवारी 2020 रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.