Bhosari: भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ

एमपीसी न्यूज – भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून भोसरीकरांनी विजयाचा निर्धार केला. भोसरीच्या विकासासाठी लांडे हेच योग्य उमेदवार आहेत. निवडणुकीत संपूर्ण भोसरीगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने लांडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास माजी नगरसेवक पंडीत गवळी यांनी व्यक्त केला.

भोसरी, लांडेवाडी येथील तुळजा भवानी मंदिरात नारळ वाढवून ‘कपबशी’ चिन्हावर अपक्ष लढणारे विलास लांडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भोसरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन त्यांनी घेतले. मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या सभेत माजी नगरसेवक पंडित गवळी बोलत होते.

यावेळी अपक्ष उमेदवार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर हनुमंत भोसले, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, अजित गव्हाणे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संजय वाबळे, नगरसेविका वैशाली घोडेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, तानाजी खाडे, विनायक रणसुभे, सुरेखा लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, विजय लोखंडे, भरत लांडगे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भोसरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विलास लांडे म्हणाले, “दत्ता साने आणि हनुमंत भोसले यांच्यासह मतदारसंघातील सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळे निवडणुकीत माझी ताकद वाढलेली आहे. मी बहुजनांचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित आहे. पाच वर्षांपूर्वी चुकीचा माणूस निवडून गेल्यामुळे मतदारसंघाची अवस्था बिकट बनली आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरू आहे. टक्केवारी दिली तरच काम मिळते, अशी स्थिती आहे.

माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले, “विलास लांडे यांना मी माझ्या नेहरूनगर भागातून मताधिक्य मिळवून देणार आहे. लांडे यांच्या विजयात नेहरूनगर हा भाग निर्णायकी ठरेल, असे आमचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.