BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याच्या समजातून मित्राचेच अपहरण आणि खून; संशयित आरोपी मित्राला अटक

एमपीसी न्यूज – पैशांपुढे मैत्री, यारी सर्वकाही स्वाहा, असा प्रकार पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथे घडला. मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याचे कोणाकडून तरी ऐकून आलिशान गाडी घेण्यासाठी मित्राच्याच अपहरणाचा बनाव रचून मित्राच्या कुटुंबीयांकडे 40 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर मित्राचा पैशांसाठी खून केला. दरम्यान, अपहरण केलेल्या मित्रासोबत दारूची पार्टी देखील केली. अपहरण आणि खून करणा-या आरोपी मित्राला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

अब्दुल अहाद सय्यद सिद्दीकी (वय 17, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. उमर नसीर शेख (वय 20 रा. खडकी) असे अटक केलेल्या संशयित आरोपी मित्राचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अब्दुल याचे वडील दापोडी येथे भंगारचा व्यवसाय करतात. त्याच्याकडे भरपूर पैसे असल्याची चुकीची माहिती आरोपी उमर याला बाहेरून मिळाली. उमर याने मागील काही दिवसांपूर्वी ‘खतरनाक खिलाडी 2’ हा चित्रपट पाहिला होता. चित्रपटात मित्राच्या आत्मसन्मानासाठी दुस-या मित्राने एका तथाकथित भाईचे अपहरण केल्याचे चित्रण आहे. मात्र, इथे उमर याने पैशांसाठी मित्राचेच अपहरण करण्याचा बनाव रचला.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास उमर हा मयत अब्दुल याच्या घरी आला. दोघेजण उमर याच्या दुचाकीवरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात गेले. विद्यापीठ परिसरात दोघांनी बिअरची पार्टी केली. यापूर्वी देखील दोघांनी मिळून विद्यापीठ परिसरात बिअरची पार्टी केल्याचे आरोपीने सांगितले आहे. पार्टी करत असताना आरोपी उमर याच्या डोक्यात अब्दुल याच्या वडिलांकडे भरपूर पैसे आहेत. त्यामुळे अब्दुलचे अपहरण केल्याचे सांगत त्याच्या घरच्यांकडे मोठी रक्कम मागण्याची योजना सुरूच होती.

पार्टी झाल्यानंतर उमर याने अब्दुलचा गळा आवळून खून केला. दरम्यान, उमर याने अब्दुलच्या घरच्यांना अब्दुलच्या फोनवरून फोन करून 40 लाख रुपयांची मागणी केली. अब्दुल याच्या घरच्यांकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. उमर याला त्या पैशातून आलिशान कार खरेदी करायची होती. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अब्दुलचा शोध सुरु केला.

रविवारी सकाळी विद्यापीठ परिसरात अब्दुलचा मृतदेत आढळून आला. भोसरी पोलिसांनी उमर याला काही तासांच्या प्रयत्नानंतर अटक केली. चित्रपट पाहून पैशांसाठी मित्राचे अपहरण आणि खून केल्याची कबुली आरोपी उमर याने पोलिसांना दिली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like