Bhosari : सागरमाथाने केले सरसगडच्या घे-यातील दोन सुळके सर

एमपीसी न्यूज -भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या सहा सदस्यांनी पाली येथील सरसगडच्या घेऱ्यातील दोन सुळके महिला दिनाच्या पूर्वसंध्येला यशस्वीपणे सर केले. निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्यवान शिरसाट, शरद पवळे, अनिल पवळे, लखन घाडगे आणि निकेश रासकर यांनी हि मोहीम यशस्वी केली, अशी माहिती संस्थापक सचिव प्रशांत पवार यांनी दिली.

अष्टविनायकांतील गणपतीचे स्थान असलेल्या पाली गावाला लागूनच असलेल्या किल्ला म्हणजे सरसगड. या सरसगडच्या घेऱ्यात, गडाच्या पूर्वेकडे एकमेकांच्या शेजारी तीन सुळके आहेत. त्यांना पूर्वेकडून अनुक्रमे जी एस-१, जी एस-२ आणि जी एस-३ असे संबोधले जाते. (जीएस = घेरा सरसगड) पैकी जी एस-१ हा सुळका जी एस-२ आणि जी एस-३च्या तुलनेत अवघड आहे.

  • दि. ७ मार्चला सकाळी साडे दहा वाजता सर्व सदस्य जी एस-१ आणि जी एस-२ या दोन सुळक्यांच्या मधल्या खिंडीत पोहोचले. सर्व तयारी करून ११:३० वाजता लखन घाडगे यांनी निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोहणास सुरवात झाली. जीएस-१ च्या आरोहणाची जबाबदारी शरद पवळे आणि सत्यवान शिरसाट यांनी स्विकारली तर, जीएस-२ च्या आरोहणाची जबाबदारी अनिल पवळे आणि लखन घाडगे यांनी स्विकारली.

दीड तासांची सावध चढाई करत अनिलने ११० फुटांवरील जीएस-२ सुळक्याचा माथा गाठला. सुरक्षिततेसाठी आरोहण मार्गात एका ठिकाणी फ्रेंड आणि दोन ठिकाणी झुडपाच्या बुंध्यांचा वापर करण्यात आला. अनिल पाठोपाठ लखन आणि निलेश यांनीही माथा गाठला.

  • दरम्यान, जीएस-२ वर शरद तसेच सत्यवान यांची चढाई चालू होती. ९० फुटांवर पहिले स्टेशन करून पुढील आरोहण चालूच होते. हा सुळका तुलनेने उंच व अवघड असल्याने मार्गात दोन पिटॉन, एक मेख व दोन ठिकाणी नवे बोल्ट ठोकावे लागले. सुमारे अडीज तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी २ वाजता शरद २०० फुट उंचीच्या जीएस-१ सुळक्याच्या माथ्यावर पोहोचला. माथ्यावरील झाडाला रोप बांधला. बांधलेल्या रोपवरून अनुक्रमे सत्यवान, लखन, अनिल आणि निकेश यांनीही सुळक्याचा माथा गाठला. संपूर्ण मोहिमेत निकेश रासकर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली. मोहिमस ज्येष्ठ गिर्यारोहक सचिन गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.