Bhosari : दुचाकीस्वाराने दिली वाहतूक पोलिसाला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला वाहतूक पोलिसाने अडविले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जे आर डी टाटा उड्डाणपुलाच्या खाली, नाशिक फाटा येथे रविवारी (दि. 26) दुपारी पाच वाजता घडली.

गणेश संभाजी चव्हाण (वय 28, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विष्णू तुकाराम नागरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. रविवारी दुपारी ते नाशिक फाटा येथे वाहतूक नियोजन करत होते. त्यावेळी नाशिक फाट्याकडून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावरून आरोपी गणेश त्याच्या दुचाकीवरून (एम एच 12 / एफ जे 6370) विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे वाहतूक पोलीस नागरे यांनी त्याला अडवून विरुद्ध दिशेने येण्याचे कारण विचारले.

विरुद्ध दिशेने येण्याचे कारण न सांगता गणेश याने पोलीस हवालदार नागरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ‘मी तुमच्या सारख्या पोलिसांना कोलतो. तू कोण मला अडवणारा व विचारणारा. मी इथला दादा आहे. माझे कोणीही काहीही वाकडे करु शकणार नाही. तुला काय तक्रार द्यायची ती दे. मी दोन दिवसात जेलमधुन बाहेर येईन, पण बाहेर आल्यावर तुझी गेम करुन टाकीन.’ अशी धमकी आरोपीने पोलीस हवालदार नागरे यांना दिली.

वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालून वाहतूक पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी गणेश याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.