Bhosari : भाडेकरू राहत असलेले घर पाडून पावणे दहा लाखांची चोरी

Theft of ten lakhs by demolishing the house where the tenant lives

एमपीसी न्यूज – घरमालकाच्या दोन नातवांनी जेसीबीच्या साहाय्याने जागेत राहत असलेल्या भाडेकरूचे घर पाडले. तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर सामान असा एकूण 9 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद भाडेकरूने दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4) रात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शंकरवाडी, कासारवाडी येथे घडली.

आशुतोष चंद्रभान यादव (वय 27, रा. शंकरवाडी, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निलेश अंकुश लांडे (वय 28), अमोल अंकुश लांडे (वय 25, दोघे रा. कासारवाडी) आणि त्यांचे 25 ते 30 पुरुष आणि 15 ते 20 महिला साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे लांडे यांच्या जागेवर भाडेतत्वावर राहत आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा ते पहाटे पाच या कालावधीत आरोपी हे यादव राहत असलेल्या घरी आले. यादव यांची पत्नी, मुलगी, भाऊ यांना घराच्या बाहेर जाण्यास सांगून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड, फिर्यादी राहत असेलेले घर तोडून घरातील साहित्य, भंगारच्या दुकानातील मटेरियल तोडले. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, कागदपत्रे आणि इतर साहित्य टेम्पोमध्ये भरून नेले.

आरोपींनी तांबे, पितळ, शोल्डर पाटा, लोखंडी चहाची टपरी असे 6 लाख 9 हजार रुपयांचे सामान आणि 3 लाख 68 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असे एकूण 9 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे म्हणाले, “फिर्यादी यादव आणि आरोपी यांचे आजोबा (जागा मालक) यांच्यात भाडेकरार झाला आहे. मात्र आरोपी निलेश आणि अमोल यांच्याकडे महापालिकेची परवानगी व इतर कागदपत्रे होती. फिर्यादी यादव यांच्याकडील कागदपत्रे त्यांनी अद्याप पोलिसांकडे सादर केलेली नाहीत. पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.