Bhosari: पिस्तूल खोटी असल्याचे म्हणताच ‘त्याने’ उडवून दाखवली पिस्तुलातून गोळी

एमपीसी न्यूज – मैत्रिणाला सोडवायला कारमधून आलेल्या तरुणाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूल दाखवत थांबवले. तरुणाने आरोपींना ढकलून देत पिस्तूल खोटी असल्याचे म्हणताच एका आरोपीने साईडला गोळीबार केला. सुदैवाने गोळी तरुणाला लागली नाही, हा प्रकार शुक्रवारी (दि. 19) रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी भोसरी, लांडेवाडीतील विकास कॉलनी येथे घडला.

याप्रकरणी अक्षय सुरेश कांबळे (वय 26, रा. बाजीरावनगर, वडगावशेरी, पुणे ) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवडाते यांनी माहिती दिली. अक्षय हा शुक्रवारी त्याच्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी भोसरीत कारमधून आला होता. लांडेवाडी येथून जात असताना पाठीमागून आलेल्या दोन आरोपींनी अक्षय याला पिस्तूल दाखवून तू थांब असे सांगितले. अक्षय याने आरोपीला ढकलून देवून तुझी बंदूक खोटी असल्याचे म्हणाला. त्यामुळे आरोपीने पिस्तुलातून बाजूला गोळीबार करत ‘ही बघ खरी आहे’ असे म्हणाला. त्याचवेळी अक्षय याने आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतली.

गोळीबाराचा आवाज आल्याने नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. नागरिक येताच आरोपी दुचाकीवरुन पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी देशी बनावटीचे एक पिस्तूल, तीन जिवंत काडतूसे आणि एक वापरलेली पुंगळी जप्त केली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.