Bhosari : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज – अचानक लागलेल्या आगीत भोसरी लांडेवाडी येथील भाजी मंडईजवळ असलेली तीन दुकाने जळून खाक झाली. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने लागली असल्याची चर्चा आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 6) पहाटे पाच वाजता घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी भोसरी येथील रसाळवाडा येथे असलेल्या भाजी मंडई जवळ पहाटे पाच वाजता अचानक आग लागली. आग काही वेळेत परिसरात पसरली. मंडई जवळ असलेल्या विकास फूटवेअर, सह्याद्री व्हरायटी आणि एक लॉन्ड्रीचे दुकान अशी तीन दुकाने जळाली आहेत.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच भोसरी उपविभागाचे फायरमन विकास नाईक, वाहन चालक प्रदीप खिले, प्रतीक राऊत, फायरमन विठ्ठल भिसे, सुरज गवळी, चंद्रशेखर घुले, प्रतीक कांबळे, मुकेश बर्वे, विक्रम कदम या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेत तिन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.