Bhosari : तिस-या वेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरीकडे!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला तीन वर्ष पूर्ण झाले असून महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद तिस-यावेळी भोसरी मतदारसंघात गेले आहे. भाजपची सत्ता आल्यावर पहिल्यावर्षी इंद्रायणीनगरच्या सीमा सावळे, तिस-या वर्षी इंद्रायणीनगरचे विलास मडिगेरी आणि चौथ्या वर्षी भोसरी गावठाणचे संतोष लोंढे यांच्याकडे स्थायीचे अध्यक्षपद जाणार आहे.

भाजपच्या सत्तेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात सत्ता वाटपाचा ‘अलिखित’ फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार नितीन काळजे, राहुल जाधव यांच्या रुपाने पहिले अडीच वर्ष महापौरपद भोसरीकडे होते. तर, आता चिंचवडच्या उषा ढोरे महापौर आहेत. मागील तीन वर्षात पहिल्यावर्षी भोसरीतील सीमा सावळे, दुस-या वर्षी चिंचवडमधील ममता गायकवाड आणि तिस-या वर्षी भोसरीतील विलास मडिगेरी स्थायीचे अध्यक्ष झाले.

सावळे, मडिगेरी भोसरी मतदारसंघातील असले तरी ते आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक मानले जातात. त्यातच महापौरपद देखील चिंचवडकडे आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद पुढील दोन वर्ष भोसरीकरांकडे राहणार आहे.  चौथ्यावर्षी भोसरीचेच संतोष लोंढे यांचा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. स्थायीत भाजपचे बहुमत असल्याने त्यांची निवड निश्चित आहे. शुक्रवारी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे चार वर्षातील तीन वर्ष महापालिका तिजोरीच्या चाव्या भोसरी मतदारसंघात राहिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.