Bhosari : गांजा आणि पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 किलो 20 ग्रॅम गांजा आणि एक पिस्तूल असा 1 लाख 20 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

विशाल गोरख कदम (वय 27), रोहन महादेव लिंगे (वय 20, दोघे रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम बी गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, दापोडी येथील एसटी वर्कशॉपजवळ दोन तरुण संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याजवळ गांजा आणि पिस्तूल आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी विशाल आणि रोहन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 3 किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा आणि आरोपी विशाल याच्या कमरेला पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी 1 लाख 20 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.