Bhosari: भोसरीत दोन दिवसीय राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 

संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था भोसरी आणि बंधुता प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 3 आणि 4 जानेवारी 2019 या दरम्यान  भोसरीतील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, प्रकाश जवळकर हे स्वागताध्यक्ष आहेत. 

याबाबतची माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.  स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे  संमेलनाचे संयोजक डॉ. अशोक शिंदे, संघटक महेंद्र भारती, शंकर आथरे उपस्थित होते. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’ तर यशवंतराव गडाख,  प्रा. तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार ‘ देण्यात येणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटन गुरुवार (दि. 3)  सकाळी 10 वाजता ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार महेश लांडगे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हाजी अफजलभाई शेख, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, उपप्राचार्य सदाशिव कांबळे, संघटक महेंद्र भारती, स्मरणिकेच्या संपादिका मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ‘अध्यक्षीय भाषण’ पुस्तकाचे, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘बंधुताचार्यांची प्रकाशगाथा’ या समीक्षाग्रंथाचे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या ‘अग्निकुंड’ समीक्षा ग्रंथाचे आणि मुल्याविष्कार या संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.

समारोप समारंभ शुक्रवार (दि. 4) सायंकाळी चार वाजता होणार असून, यावेळी ज्येष्ठ लेखक यशवंतराव गडाख आणि प्रा.तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी पुणे पीपल्स सहकारी बँक मर्यादित यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण होईल.

एकूण आठ सत्रात होत असलेल्या या संमेलनात दुसर्‍या सत्रात डॉ. अशोककुमार पगारिया यांची प्रकट मुलाखत शंकर आथरे घेणार आहेत. यावेळी ‘श्यामची आई संस्था पुरस्कार’ नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय आणि भोसरीतील भैरवनाथ विद्यालय यांना प्रदान केला जाईल. यावेळी डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. जे. पी. देसाई, डॉ. शिरीष लांडगे, राजेंद्र धोका यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात ‘थोडंसं भान असुद्या’ या विषयावर ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान होणार आहे. चौथ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव आव्हाड यांचे ‘संविधानिक आरक्षण व विद्यमान आरक्षण समस्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील यशवंतांना भूमिपुत्र पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी (दि. 4) सकाळी साडे नऊ वाजता पाचव्या सत्रात ‘काव्यपंढरी’ हे कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी अनिल दीक्षित असतील. कवीसंमेलनात उद्धव कानडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. भीम गायकवाड, बबन धुमाळ यांच्यासह इतर मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.

सतीश खाबिया, प्रा. चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संतोष घुले यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, तर दीप पारधे यांना ‘लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सहाव्या सत्रात लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांचे ‘स्त्रीवादी साहित्य : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मोहिनीताई लांडे आणि आकांक्षा प्रतिष्ठानच्या राणीताई चौरे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सातव्या सत्रात प्रा. तेज निवळीकर यांचे ‘मूल्य शिक्षणाचे पहिले मुक्त विद्यापीठ – संत गाडगेबाबा’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था आणि कलांगण कला संस्था यांना ‘राजश्री शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.