Bhosari : दोन सराईत गुन्हेगारांना अटक; दोन पिस्तूल जप्त

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने दिघी मॅगझीन चौकात केली.

प्रदीप उर्फ पद्या प्रकाश तापकीर (वय 26, रा. बापूजी बुवा चौक, माळी आळी मित्र मंडळाशेजारी, भोसरी), किरण संजय कटके (वय 23, रा. दुर्गा माता कॉलनी, जय महाराष्ट्र चौक, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक किरण काटकर यांना माहिती मिळाली की, दिघी मधील मॅगझीन चौकात पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार पद्या त्याच्या मित्रांसोबत थांबला असून त्याच्याजवळ पिस्तूल आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मॅगझीन चौकात सापळा रचून प्रदीप आणि किरण या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत दोघांना अटक केली.

आरोपी प्रदीप तापकीर याच्यावर खून, दरोड्याच्या तयारी असणे, मारहाण, अपहरण, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये आठ गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्हा कराड पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर अपहरणाचा एक गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. प्रदीप याला 5 जुलै 2016 रोजी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधवणे, महेश खांडे, आशिष बोटके, नितीन लोखंडे, उमेश पुलगम, किरण काटकर, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.