Bhosari: भाजपकडून अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परताव्याची खोटी जाहिरातीबाजी -दत्ता साने

भाजपने पिंपरी-चिंचवडमधील जनतेची जाहीर माफी मागावी

एमपीसी न्यूज – शहरातील अनधिकृत बाधकामे, बैलगाडा शर्यत आणि साडेबारा टक्के परताव्याच्या खोट्या जाहिराती भाजपने केल्या आहेत. या खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून शहरवासियांची फसवणूक केली जात आहे. आमदारांच्या या वर्तणूकीमुळे भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमधील जनतेची जाहीर माफी मागावी, असे मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या फोटोसह अनेक फलक शहरात झळकत आहेत. “आमचे आश्वासने, आमचा पाठपुरावा” या शिर्षकाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामाची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. शहरभर लागलेल्या या जाहिरातींबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांना फसविण्याचा हा सगळा प्रयत्न या जाहिरतातींमधून सुरू आहे, असा आरोप साने यांनी केला आहे.

सुमारे 1 हजार चौरस फुटांपर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित केल्याच्या जाहिराती लावल्या. प्रत्यक्षात या प्रकारे कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जो अध्यादेश काढला. त्यानुसार अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी किती अर्ज आले आणि किती जणांची घरे अधिकृत झाली ? हा संशोधनाचा मुद्दा आहे.

प्राधिकरणाने संपादित क्षेत्राचा शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिल्याचा प्रचार आमदार करत आहेत. प्रत्यक्षात साडेबारा टक्के परतावा देण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य शासनाकडून कोणताही कायदेशीर निर्णय अद्याप पूर्ण झालेला नाही, असेही साने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.