Bhosari : प्राधिकरणाच्या भूखंडावर बेकायेदशीरपणे वाहनांचे पार्किंग; कारवाईची मागणी

प्राधिकरण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) भोसरी, इंद्रायनीनगर सेक्टर तीन येथील भूखंडावर एमआयडीसी परिसरातील वाहतूक व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे वाहनतळ सुरु केले आहे. मालवाहतूक गाड्या याठिकाणी पार्क केल्या जातात. याकडे प्राधिकरण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच प्राधिकरणाने संबंधितांना नोटीसा पाठवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्राधिकरणाचे शहराच्या विविध भागात भूखंड आहेत. भोसरी, इंद्रायणीनगर सेक्टर तीन येथे साडेबारा टक्के परताव्याचे प्लॉट आहेत. या प्लॉटवर बेकायदेशीरपणे एमआयडीसी परिसरातील व्यावसायिकांकडून मालवाहतूक वाहने पार्क केली जात आहेत. जागेची ‘जेसीबी’च्या सहाय्याने लेव्हल करुन वाहनतळ निर्माण केले आहेत. त्यासाठी झाडांची कत्तल देखील करण्यात आली आहे. गतीरोधक तोडण्यात आले आहेत. प्राधिकरणाचा लाखोंचा महसूल बुडत असून भूखंडावार बेकायदेशीपरणे वाहनांची पार्किंग केली जात असताना प्राधिकरण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

इंद्रायणीनगर येथील रहिवाशी शरद सोनवणे म्हणाले, ”भोसरी एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बिधास्तपणे या जागांचा वापर पार्किंगसाठी करत आहेत. त्यामुळे प्राधिकरणाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. सेक्टर तीन मधील समर्थनगरीच्या मागे असलेल्या प्राधिकरणाच्या जागेवर मालवाहतूक वाहने पार्क केली जात आहेत. काहीजण या जागेचा खासगी कामासाठी वापर करत आहे. या जागेवर रोज रात्री जवळपास चार ते पाच ट्रक लावण्यात येतात. जागेचा बेकायदेशीरपणे वापर केला जात असतानाही प्राधिकरण त्याबाबत काहीच कारवाई करत नाही”

प्राधिकरण प्रशासनाने तातडीने संबंधितांना नोटीस पाठवून जागा खाली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर चार ते पाच ई-मेल आयडी दिले आहेत. परंतु, ते सर्व बंद आहेत. त्याच्यावर मेल जात नाही. त्याचबरोबर संकेतस्थळावरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे प्राधिकरणाने संकेतस्थळावरील भ्रमणध्वनी नंबर आणि ई-मेल आयडी बदलून घ्यावेत, अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे. याबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना पत्र दिले आहे.

याबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके म्हणाले, ”सेक्टर तीन येथील प्राधिकरणाच्या भूखंडावर एमआयडीसी परिसरातील वाहतूक व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे वाहनतळ सुरु केले असल्याची तक्रार आली आहे. अधिका-यांना त्याची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पाहणी केल्यानंतर संबंधितांना नोटीस दिली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.