Bhosari : भोसरीत विलास लांडे यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांच्या रॅलीला भरपावसात उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज – तरुणांची तुफान गर्दी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि. १९) संपूर्ण भोसरी परिसरात भर पवासात रॅली काढली. जनतेशी संवाद साधत कपबशी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. लांडे यांनी दहा वर्षे आमदार असताना झालेल्या विकासकामांवरच आताच्या आमदारांनी आयत्या रेघोट्या ओढण्याचे काम केले आहे. लांडे यांचा मतदारसंघातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते गुंडप्रवृत्तीचे नाही, तर सामान्यांचे नेतृत्व करतात. त्यांना मतदारसंघातील मतदारांविषयी आपलेपणा आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा त्यांच्याच हातात द्यावे, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी नागरिकांना केले.

शनिवारी भोसरी, लांडेवाडी येथील तुळजा भवानी मंदिरात दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी रॅलीला सुरूवात केली. पुढे गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, पीसीएमटी चौक, खंडोबा माळ, दिघी रोड, आळंदी रोड, च्रकपाणी वसाहत, सद्गुरूनगर, धावडे वस्ती, भगत वस्ती, इंद्रायणीनगर भागात रॅली संपन्न झाली. या रॅलीत माजी महापौर मोहिनी लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती माजी सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक संजय वाबळे, नगरसेविका अनुराधा गोफणे, भरत लांडगे यांच्यासह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्ष (गवई गट) यांच्यासह महाआघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “आमदार हा जनतेच्या अडीअडचणी सोडवणारा असावा. लोकांच्या भावना जाणून घेणारा आणि त्यांचे मन जपणारा असावा. परंतु, भोसरी मतदारसंघात वेगळेच चित्र आहे. मतदारसंघातील जनता अडीअडचणी सुटण्यासाठी आमदाराकडे जाऊ शकत नाहीत. त्यांना आमदाराकडे जाण्यासाठी भीती वाटते, असे भययुक्त मतदारसंघ आता मतदारांनी भयमुक्त करावे. लोकांच्या मनात जे ठरते, तेच मतात उतरते. लोकांनी ठरवले तर सर्वांना आपला वाटणारा माणूस आमदार होऊ शकतो आणि दादागिरी करणाऱ्याला जमिनीवर आणण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे कोणी कितीही दादागिरीची भाषा केली तरी जनतेचा कौल ठरलेला आहे. तो कौल या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या कपबशीला निश्चित मिळेल. कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निव्वळ जनतेला फसविण्याचे काम केले आहे. भोसरी मतदारसंघातही “व्हिजन २०-२०”चे गाजर दाखवून विकासकाचा भूलभूलैय्या तयार केला गेला आहे. त्याला येथील मतदार या निवडणुकीत निश्चित उत्तर देतील.”

विलास लांडे म्हणाले, “शिवछत्रपतींचा चालवू पुढे वारसा, भ्रष्टाचारी व खंडणीखोरांना दाखवू आरसा, अठरापगड जाती जोडोनिया शिस्तबद्ध भोसरी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मी किटबद्ध आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेने पाच वर्ष तुमच्यावर अन्याय केलेल्यांना या निवडणुकीत हद्दपार करून कपबशीला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.