Bhosari: ‘घड्याळ’ नाकारुन अपक्ष लढण्याची विलास लांडे यांची खेळी फसली!

भोसरीकरांनी अपक्ष विजयाची परंपरा मोडित काढली

एमपीसी न्यूज – अपक्ष उमेदवार म्हणून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून निवडून येण्याचा भोसरी विधानसभेचा फॉर्म्युला यावेळी फसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा अपशकून होण्याची भीती व्यक्त करीत माजी आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी नाकारली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद पवार ‘गेम चेंजर’ ठरले. पक्षाची राज्यभरातील मुसंडी पाहता राष्ट्रवादीचे चिन्ह नाकारुन लांडे यांची फसगत झाल्याची जोरदार चर्चा भोसरीच्या राजकारणात रंगली आहे.

भोसरी मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर 2009 साली पहिली विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी लांडे यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून भोसरीवर विजयाची पताका फडकावली.विजयानंतर राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. 2014 ची निवडणूक लांडे यांनी राष्ट्रवादीच्या ‘घड्याळावर’ लढविली. परंतु, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मोदी लाटेत महेश लांडगे अपक्ष निवडून आले. दोनही निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडून आल्याने यावेळीही लांडे यांनी अपक्ष लढण्यास पसंती दिली.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊ की नाही? याची भिती असल्याने लांडे यांनी उमेदवारी नाकारली. लढावे की नाही? या घोळात शेवटच्याक्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 2009 मध्ये लाभदायक ठरलेले ‘कपबशी चिन्ह’ मिळाले. अपक्ष उमेदवारीमुळे ईव्हीएमवर ते अकराव्या क्रमांकावर फेकले गेले. राष्ट्रवादीने पुरुस्कृत केले. पण, काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवातीला तयार होत नव्हती. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने होकार दर्शविला. त्यांच्या प्रचारासाठी कोणत्याही नेत्याची सभा झाली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह विलास लांडे यांनी घेतले असते. तर, चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे सोपे झाले असते. याखेरीज ईव्हीएमवरही लांडे वरच्या स्थानी राहिले असते. शरद पवार यांच्याबाबत राज्यात सहानभुती निर्माण झाली होती. त्याचा देखील लाभ विलास लांडे यांना झाला असता. त्यामुळे लांडे यांचे अपक्ष निवडणूक मैदानात उतरण्याची खेळी फसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.