Bhosari : इंद्रायणीनगरमध्ये पाणीटंचाई

एमपीसी न्यूज – चोवीस तास पाणीपुरवठा अंतर्गत इंद्रायणीनगर परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे. ज्या भागात हे काम पूर्ण झाले. त्या भागात नळजोडणीतील त्रुटीमुळे विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप इंद्रायणीनगरवासियांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांसह इंद्रायणीनगर प्रभागात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागात नळजोडणी करण्यात आली आहे. जुन्या जलवाहिन्या काढून अथवा बंद करुन नवीन वाहिन्यांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, नवीन जोडणीत त्रुटी आहेत. त्यामुळे अपु-या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

महापालिकेकडून आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, दुस-या दिवशीही इंद्रायणीनगर भागात मुबलक पाणी पुरवठा होत नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे एक दिवसाची कपात असताना दोन दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यात दररोजचा पाणी पुरवठा कमी झाल्याने टँकर मागवावे लागत असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.