Pimpri : भोसरी विधानसभा मतदारसंघातील बदलले समीकरण; आझमभाईंचा विलास लांडे यांना पाठिंबा!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘किंग मेकर’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी आज (बुधवार) भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला. बहुजनांचा नेता अशी ओळख असलेल्या पानसरे यांच्या पाठिंब्यामुळे भोसरी विधानसभेतील समीकरण बदलल्याचे आज स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे गतवेळी पानसरे यांनी लांडगे यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. त्याच पानसरे यांनी लांडे यांना साथ देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे लांडे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत सर्वपक्षीयांची मोट बांधत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अत्यंत चाणाक्ष आणि भोसरी मतदारसंघात लोकप्रियत असलेल्या लांडे यांनी घेतलेला निर्णय दिवसेंदिवस यशस्वी ठरू लागला आहे. विविध संस्था, संघटना, पक्षांच्या पाठिंब्यासोबतच आता आझम पानसरे यांचीही ताकद लांडे यांना मिळणार असल्याने लांडे 2009 च्या विजयाच्या पुनरावृत्ती करणार हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे.

भोसरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न देता विलास लांडे यांना पुरस्कृत केल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच विविध संघटना, संस्था, आघाड्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेसनेही विलास लांडे यांना पाठिंबा दिला. सामाजिक संघटनांकडूनही अपक्ष उमेदवार म्हणून विलास लांडे यांना पाठिंब्याचा ओघ सुरु आहे. त्यामुळे विलास लांडे यांनी उचल खाल्ली असून भोसरी विधानसभा मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. त्यांच्या प्रचारातील महिला व युवकांचा स्वयंस्फूर्तीने वाढता सहभाग यामुळे वातावरण ढवळून निघाले असतानाच आज लांडे यांच्यासाठी सुखद धक्का देणारी घटना घडली.

शहराच्या राजकीय पटलावर हुकुमी एक्का म्हणून ओळखले जाणारे आझम पानसरे यांनी लांडे यांना पाठिंबा दिल्याने भोसरी विधानसभा मतदार संघातील समीकरणे बदलली आहेत. आझम पानसरे मागील काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पानसरे यांनी आपल्या सर्वसमावेश शैलीमुळे बहुजन समाजाला आपल्याशी बांधून ठेवले आहे.

नगरसेवक, महापौर ते राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्षपदापर्यंत राजकीय आलेख चढता ठेवताना पानसरे यांनी अनेकांना घडविले. सर्वपक्षीय नेत्यांशी पानसरे यांचे आजही सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पानसरे यांनी विविध पदांवर काम केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, तेथे ते फार काळ रुळले नाहीत. त्यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांचा यावेळच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला. त्यामुळे आझम पानसरे पुन्हा स्वगृही परतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमधील कामाचा अनुभव, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव यामुळे राजकीय खाचखळगा त्यांना माहिती आहे. पानसरे यांचे लांडे यांना बळ मिळाल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. तसेच भोसरी विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.