Bhosari Crime News : एमआयडीसी भोसरी परिसरात तीन मोबाईल, एक मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत महिलेचे 50 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. तर दुस-या घटनेत तिघांचे मोबाईल फोन चोरटयांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी मंगळवारी (दि. 19) दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत रंजना सुधाकर टिक्कल (वय 50, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी टिक्कल त्यांच्या मैत्रिणीसोबत सोमवारी (दि. 18) रात्री सव्वानऊ वाजता मोशी येथून रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने टिक्कल यांच्या गळ्यातील 50 हजारांचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.

दुस-या घटनेत नामदेव विठ्ठलराव बिरादार (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बिरादार, गायत्री राजेश कोलते आणि प्रथमेश कैलास नाईकडे असे तिघेजण फोनवर बोलत पायी चालत जात होते. दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचा 10 हजारांचा, गायत्री कोलते यांचा नऊ हजारांचा आणि प्रथमेश नाईकडे यांचा नऊ हजारांचा असे 28 हजारांचे तीन मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेले. सोमवारी रात्री आठ ते अकरा वाजताच्या कालावधीत ही घटना घडली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.