Bhosari : जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भोसरीतील योगेश जाधवने पटकाविले कांस्यपदक

राष्ट्रवादीचे तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी केले आर्थिक सहाय्य

एमपीसी न्यूज – मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या अॅमच्युअर ऑलिम्पिया 2019 या जागतिक स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धेत भोसरीतील योगेश जाधव याने कांस्यपदक पटकाविले आहे. युएस येथे होणा-या ‘मिस्टर ऑलिम्पिया’ स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकण्याचे ध्येय योगेश याचे आहे. योगेश हा सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगावचे शहराध्यक्ष, नगरसेवक गणेश काकडे आर्थिक सहाय्य करत असल्याचे योगेशने सांगितले.

मुंबईतील गोरेगाव 15, 16, 17 नोव्हेंबर रोजी अॅमच्युअर ऑलिम्पिया 2019 ही शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातून 500 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये भोसरीतील योगेश याने तिसरा क्रमांक पटकावित कांस्यपदकाला गवसणी घातली. जगप्रसिद्ध शरीरसौष्ठव फिल हिथ यांच्या हस्ते योगेश याला कांस्यपदक देण्यात आले.

सर्वसामान्य कुटुंबातील योगेश हा मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो भोसरीत स्थायिक आहे. वडिलांचे छत्र हरपले असून आई आणि भावासोबत तो राहतो. भोसरीतील जिजामाता महाविद्यालयातून त्याने बीसीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. योगेश हा अॅमच्युअर ऑलिम्पिया या स्पर्धेची दोन वर्षांपासून तयारी करत होता. प्रशिक्षक बी.के. सिंग आणि टीम फिरा यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत होता. योगेश हा जीम ट्रेनर आहे. थेरगाव येथील एस.के. 20-7 या जीम मध्ये तो प्रशिक्षक आहे.

मागील सहा वर्षांपासून जीम, आहारासह त्याचा सर्व खर्च तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक गणेश काकडे करत आहेत. दोन वर्षांनी युएस येथे होणाऱ्या ‘मिस्टर ऑलिम्पिया’ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे योगेश याने ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

योगेश याने पनवेल येथे झालेल्या ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री 2018’ या स्पर्धेत -‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकाविली होता. तर, राजस्थान येथे झालेल्या ‘ज्युनिअर मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत देखील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबाला योगेशने गवसणी घातली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.