Bhosari News : भोसरीकरांचा गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

एमपीसी न्यूज – एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत – ढोल-ताशा, लेजर-शोसह डीजेचा दणदणाट… आणि भंडा-याची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात भोसरीतील मंडळांच्या गणरायांच्या मुर्तीचे गुरूवारी विसर्जन करण्यात आले.

गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट होते.त्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आमगन झाले. हाच उत्साह आणि जल्लोष गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही दिसून आला.अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी भोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील मैदानात गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने तीन हौद बांधले होते. या ठिकाणी आणि मोशी येथे इंद्रायणी नदीघाटावर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात होते.

महापालिकेच्यावतीने पीएमटी चौकात स्वागतकक्ष उभारण्यात आला होता.मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ढोल-ताशा, झांज पथकाचा दणदणाट बहूतांशी मिरवणुकीत दिसून येत होता.सायंकाळी सव्वापाच वाजता अष्टविनायक मित्र मंडळांच्या गणरायाचे पीएमटी चौकात आगमन झाले.मंडळाने आकर्षक पुष्परथ तयार केला होता. सायंकाळी सहानंतर गणेश मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर येऊ लागल्या.त्यामुळे रस्ते गर्दीने फुलून गेले.

भोसरीतील मानाचा गणपती असणा-या लांडगे लिंबाची तालीम मंडळांने ‘बालाजी रथ’ साकारला होता. मंडळाचा गणपती आकर्षक पुष्परथात विराजमान झाला होता.मिरवणुकीत कात्रज येथील मल्लखांबाचे खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी दाखविलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. समस्त गव्हाणे तालीम मंडळाचा ‘मयुररथ’ लक्ष वेधत होता.लांडेवाडीतील नव महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती आकर्षक ‘पुष्परथात’ विराजमान झाला होता. पठारे – लांडगे तालीम व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती भव्य ‘बालाजी रथात’ आरूढ झाली होती. मिरवणूकीत श्रीराम ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी तरूण मंडळाचे गणराय गजरथात विराजमान झाले होते.

फुगे – माने तालीम मंडळाचा फुलांनी सजवलेला आकर्षक ‘रामकृष्णहरी’ रथ मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरला. विविध प्रकारच्या फुलांनी हा रथ सजवण्यात आला होता. मिरवणुकीतील भगवान शंकराच्या भव्य मुर्तीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाप्पांसमोर फुलांच्या पायघड्या टाकत कार्यकर्त्यांनी आपल्या बाप्पांना निरोप दिला. श्री गणेश मित्र मंडळानेही आकर्षक अशा रंगसंगतीने सजलेला नेत्रदिपक ‘पुष्परथ’ तयार केला होता. खंडोबा मित्र मंडळाने बँड पथक आणले होते. त्यांचा लेजर-शो विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरला. तरुणांनी या लेदर शोवर एकच ठेका धरला.

लांडगे ब्रदर्स अ‍ॅण्ड फ्रेंडस सर्कल या मंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा साकारला होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने त्यांनी महत्वाचे क्षण या मिरवणुकीमधून साकारले. श्रीराम मित्र मंडळाने आकर्षक ‘पुष्परथ’ तयार केला होता. विविध मंडळांच्या मिरवणुकांमध्ये गजर, रणझुंजार, भगवे प्रतिष्ठान, वाढेश्वर प्रतिष्ठान, शिवतांडव, निनाद, वेदांत, विघ्नहर्ता, समता, गंधार, मल्हार आदी ढोल-ताशा मुला-मुलींची पथके सहभागी झाली होती. रात्री उशिरापर्यंत परिसरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.