Bhosri Crime : रहाटणी व भोसरी येथे घरफोडीच्या घटना

एमपीसी न्यूज – भोसरी व रहाटणी (Bhosri Crime) या परिसरात शनिवारी (दि.17) रात्री ते रविवारी (दि.18) पहाटेपर्यंतच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये सुमारे पावणे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. यावरून वाकड व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहाटणी येथील शिवराजनगर परिसरात शनिवारी (दि.17) रोजी सायंकाळी सहा ते पावणे आठ या कालावधीत घरफोडी झाली. चोरट्यांनी डल्ला मारून दोन लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. किरण विजयकुमार शिंदे (वय 36, रा. शिवराज नगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Bhosri Crime) शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीसह मुलाला घेण्यासाठी डांगे चौक येथे गेले होते. ते मुलाला घेऊन रात्री पावणे आठ वाजता परत आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. अवघ्या पावणे दोन तासात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. या हॉलमधील लाकडी कपाटातून दोन लाख 10 हजारांचे सोन्याचे दागिने, 1 हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Wakad : वाकड येथून पार्क केलेली रिक्षा चोरीला

तर, दुसऱ्या घटनेत बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी दीड ते रविवारी (दि. 18) पहाटे सव्वा पाच वाजता च्या कालावधीत दिघी रोड, भोसरी येथे घडली. कुंडलिक बबनराव पिंपरकर (वय 54, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी दुपारी त्यांच्या गावी गेले होते. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. एक लाख 34 हजारांचे सोन्याचे दागिने, 16 हजारांचे चांदीचे दागिने, दोन लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी पहाटे फिर्यादी गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.