Bhosri: ‘कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी’; राष्ट्रवादीची उमेदवारी कोणीच घेतली नाही!

माजी आमदार विलास लांडे यांना केले पुरस्कृत; माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही भरला अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज – एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अखेरपर्यंत तगड्या इच्छुकांनी भोसरीत राष्ट्रवादीची उमेदवारीच घेतली नाही. माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक दत्ता साने यांनी पक्षाची उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अखेरीस पक्षाने लांडे पुरस्कृत केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आज (शुक्रवार) अंतिम दिवस होता. भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यास कोणीही तयार झाले नाही. माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष लढण्याचे अगोदरच जाहीर केले होते. तर, नगरसेवक दत्ता साने राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छूक होते. लांडे अपक्ष लढल्यास मतांची विभागणी होईल या याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे लांडे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती.

परंतु, लांडे अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे साने यांनीही अपक्षच अर्ज भरला आहे. पक्षाने देखील अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. आता पक्षाने लांडे यांनी पुरस्कृत केले आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी? अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.