Vadgaon Maval News : मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

दोन दशकातील बॅकलॉक भरून काढण्यासाठी अजित दादांचे मावळला झुकते माप

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील प्रशासकीय इमारतीबरोबर विविध विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 20) होणार असल्याची माहीती मावळचे आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे व ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सुभाषराव जाधव यांनी दिली.

मागील दोन दशकातील बॅकलॉक भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्याला झुकते माप दिले असून मागील दोन वर्षात तब्बल साडेसातशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मावळला मिळाला असल्याचेही आमदार शेळके म्हणाले.

बुधवारी आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा व आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणारा अभीष्टचिंतन समारंभ या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. आमदार सुनिल शेळकेसह  तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्याचा पंधरा ते वीस वर्षातील विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचा विकास निधी देऊन मावळला झुकतं माप दिलं आहे. त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मावळातील जनतेने वडगाव मावळ येथील जाहीर सभेत उपस्थित राहावे असे आवाहन देखील मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

वडगाव मावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेळके यांनी माहीती दिली. गेल्या दोन वर्षात साडेसातशे कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून अजित पवार यांच्या हस्ते लोणावळा येथील उपजिल्हा रुगणालय व अंतर्गत रस्ते, एकविरा देवी ते लोहगड रस्ता, कामशेत ते गोवित्री रस्ता, कान्हे येथील उपजिल्हा रुगणालय, वडगाव नगरपंचायत इमारत व अंतर्गत रस्ता, तळेगाव दाभाडे नगरपरीषद इमारत, 24 पाणीपुरवठा योजना, पवना नदीवरील 4 पुल व इद्रायणी नदिवरील 3 पुल या सर्व विकासकामांचे भुमिपुजन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता वडगाव येथे जाहीर सभा होणार असून खासदार श्रीरंग बारणे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप हेही उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सांगितले.

त्यानतंर वडगाव शहरातुन अजित पवार  व सुनिल शेळके यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असुन येथील पोलीस स्टेशन येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. आमदार सुनिल शेळके यांनी केलेल्या विविध विकास कामांचे अहवाल प्रकाशन तसेच  मावळच्या जनतेच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात  येणार असल्याचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सांगितले.

मंत्रीपदाची अपेक्षा नाही – सुनिल शेळके

येत्या 20 तारखेला अजित पवार यांच्या उपस्थितीत येथे ऐतिहासिक सोहळा होत असून मंत्रीपदाची तयारी का? असे विचारले असता आमदार शेळके यांनी मला मंत्रीपदाची अपेक्षा नसून मावळच्या विकासाचा 25 वर्षाचा बॅकलॉक भरुन काढण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.